Thursday, June 07, 2007

बचाव सर्प्दंशापासून

सह्याद्रीच्या दर्यखोर्य़ांमध्ये भटकताना सर्वात जास्त भिती असते ती सापांची.. या सापांकडून बचावासा्ठी काही खबरदारीचे नियम मी इथे देत आहे..

१) ज्या ठिकाणी वाढलेले गवत आहे अशा ठिकाणी शक्यतो पायवाट सोडून जाऊ नये. अगदीच गरज भासल्यास आपल्या मार्गात साप नाही याची खात्री करूनच गवतात शिरावे.
२) गवतातून चालताना पायात बूट घालूनच वावरावे. उंच गवतात जायचे असल्यास नेडगी व पोटरी यांच्या संरक्षणार्थ "शिनगार्ड" चा वापर करावा.
३) जंगलात किंवा दाट झाडीतून चालताना डोक्यावर टोपी घालून चालावे. यामुळे झाडांवर असणा~या सापांपासून संरक्षण मिळते.
४) सरपण गोळा करताना लाकडाखाली किंवा सालीखाली लपलेला साप चावण्याची भिती असते. अशावेळी विशेष काळजी घ्यावी. (विशेषत: पावसाळ्यात).
५) उन्हाळ्यात साप गारव्याच्या शोधात असतात. अशा वेळी ते ओलसर जागेकडे आकर्षित होतात. पाणी वापरण्याची जागा तंबूपासून दूर ठेवावे. या जागांभोवती उजेड ठेवावा. अंधारात अशा ठिकाणी अंधारात जावे लागल्यास टॉर्च घेऊनच जावे.
६) तंबूत वस्तू ठेवताना खाली ठेवण्याऐवजी उंचीवर लटकवून ठेवावे. खाली ठेवलेल्या हॅवरसॅक व बूटांमध्ये साप व विंचू लपून बसू शकतात.
७) जेवण झाल्यावर शिल्लक अन्न बरेचदा टाकून देण्यात येते. या अन्नाजवळ उंदरे येतात. या उंदरांच्या वासामुळे साप देखील आकर्षित होतात. यामुळे खरकटे अन्न शक्यतो तंबूपासून लांब अंतरावर टाकावे.
८) डोंगर कपारी व कडे चढताना बरेचदा दगडांमधील सांदीमध्ये बोटे रूतवून आधार घेतला जातो. अशावेळी आत काही नसल्याची खात्री करून मगच बोटे घालावीत.
९) रस्त्यात पडलेले ओंडके व खडक ओलांडून पलिकडे जाताना पलिकडे साप नसल्याची खात्री करून मगच पाऊल टाकावे. बरेचदा या दगड किंवा ओंडक्याखाली गारव्यासाठी व सावलीसाठी बसलेल्या सापावर पाऊल पडल्यास चवताळून तो चावण्याची शक्यता असते.
१०) निसर्गामध्ये आपल्या मार्गात साप आहे व त्याला आपली जाणीव झाली असे जाणवल्यास हालचाल न करता स्तब्ध उभे रहावे. सापाला हालचालीची भिती वाटते व साप केवळ भितीपोटीच हल्ला करतो. हालचाल न केल्यास थोडा वेळ अंदाज घेऊन साप निघून जाईल.

No comments:

Google