Thursday, June 14, 2007

येरे घना, येरे घना

येरे घना, येरे घना
न्हावूं घाम माझ्या मना


या ओळी आठवण्याचे कारण म्हणजे सध्या बहरत असलेला वर्षा ऋतु. पाऊस आला की "येरे येरे पावसा" हे लहानपणी गायलेले गाणॆ आठवते. लहानपणीचे पावसात भिजणे, गोलगोल गिरक्या घेत पाऊस अंगावर घेणे, गारा वेचुन खाणे, भन्नाट वारा वाहत असताना वा~यासोबत पळायचा प्रयत्न करणे, पावसाचे पाणी एकमेकांच्या अंगावर उडवणे, साचलेल्या पाण्यातून वेगाने सायकल नेवून हे तुषार अंगावर घेणे, चिखलामध्ये खेळणे हे सर्व लहानपणाच्या पावसाच्या आठवणीची विविध रूपे आहेत.
तारुण्यात या पावसाचे संदर्भ बरेच बदलतात. तारुण्यात पाऊस येतोच तो मुळी प्रेमाची साद घालत. तरूण मुला मुलींना हातात हात घेऊन पावसात भिजण्य़ाचे स्वप्न दाखवत येणा~या या पावसात खडकवासला, सिंहगड किंवा लोणावळ्याला जाऊन मनसोक्त भिजणे व त्यानंतर गरम गरम चहा किंवा मक्याचा आस्वाद घेणे यासारखे दुसरे सुख नाही.
भटकंती च्या चाहत्यांसाठी हा काळ खुपच महत्वाचा असतो. बरेच दिवस कोप~यात पडुन असणारे ट्रेकिंग किट आता खुनावू लागते आणि राजगड, तिकोना, कोथळीगड, कोरीगड, हरीश्चंद्रगड ही नावे अचानक आठवू लागतात. मग काय, सुरू होते या गडावरून त्या गडावर प्रवास.
या ऋतुत प्रत्येकाच्या मनातील चित्रकार, कवी, गीतकार, ट्रेकर, प्रेमी जागा होतो. पण सर्वात प्रकर्षाने जाणवतो तो म्हणजे प्रत्येकाच्य़ा आत लपलेले छोटे मुल. या पावसाळ्य़ात आपल्या सर्वांमध्ये लपलेल्या या छोट्या मुलास मनसोक्त खेळू द्या ही आपणा सर्वांस विनंती..

आपणा सर्वांस वर्षा ऋतुच्या हार्दिक शुभेच्छा..

No comments:

Google