एका मित्राने mail केलेले हे एक विडंबन. सध्याच्या राजनितीक स्थितीचे हे अचुक विडंबन ज्याने लिहीले त्याच्या डोक्याची खरोखरच दाद द्यावी लागेल.
आमच्या आदर्श भारत विद्यालयाचा कारभार तसा भरपूर पसरलेला. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही! त्यात दर पाच वर्षांनी शाळेचे सुपरवायझर बदलतात. सुपरवायझरपदासाठी चक्क निवडणूक होते. अर्थात सुपरवायझर कुणी व्हायचं हे आमच्या कनका मॅडमच ठरवतात. मॅडम खूप कडक आहेत.
त्यांच्याशी बोलायचं म्हणजे सगळ्यांची "त त प प' उडते. पण सुपरवायझर व्हायची इच्छा असलेले लोक पाच वर्षांपासून मॅडमना गूळ लावीत असतात; काही गळ टाकून बसलेले असतात. तरीही मॅडम वश होतीलच, असं नाही. खरं म्हणजे मॅडमच्या सासूबाईसुद्धा आमच्याच शाळेत मुख्याध्यापिका होत्या. त्या तर "पीटी'च्या तासाला सगळ्या सरांना गुडघ्यावर बसून रांगायला लावायच्या म्हणे. म्हणजे व्हायचं काय, त्या म्हणायच्या, फक्त गुडघ्यावर बसा; पण सगळे सरच रांगायला लागायचे. काही जण तर मॅडमच्या घरी झाडूपोछा, दळण आणणे, सारवणे असली कामंही करायचे. काही हुशार मॅडमच्या पोराशी "मोटार मोटार' खेळायचे!
आमच्या कनका मॅडमनी ते सगळं पाहून पाहून नीट शिकून घेतलंय. आता पुन्हा एकदा "पीटी'चा तास सुरू झालाय. व्हॉट अ "पिटी'! खरं म्हणजे सुपरवायझरला शाळेत काहीच अधिकार नाहीत. सगळं ठरवतात मॅडमच. त्यांनी नेमलेले नवे मुख्याध्यापक खूप दयाळू आहेत. ते बोलतातसुद्धा खूप हळू. पण शिकवत काहीच नाहीत. ते असो. सुपरवायझरला अधिकार नसले तरी शाळेत त्यांना स्वतंत्र केबिन आहे. शाळेत कुणी पाहुणे आले, की त्यांनाच फार भाव असतो. शिवाय पोराटोरांवर ओरडत वर्गावर्गांतून ऐटीत फिरता येतं.
यंदा आमच्या शाळेत मॅडमचे खूप लाडके वाकूरकर सर हेच सुपरवायझर होणार, असं कळलं होतं. पण ते फक्त उजवीकडं पाहतात, असा आक्षेप आमच्या डावखरे सरांनी घेतला. डावखरे सर खूप जुने आणि कडक आहेत. त्यांना उजवीकडं पाहिलेलं आवडत नाही. कनका मॅडम कितीही भारी असल्या, तरी डावखरे सरांना वचकून असतात. डावखरे सरांचे लोक शाळेच्या कार्यकारिणीत आहेत, त्यामुळंसुद्धा ते भाव खातात. अखेर आमच्या जयनगरच्या शाळेतल्या जळगावकरबाईंना सुपरवायझर करायचा निर्णय मॅडमनी घेतला. त्या मॅडमचं नावसुद्धा आमच्या शाळेत अनेकांना माहिती नव्हतं. त्या दिवशीसुद्धा त्या रजा घेऊन शिवणकामाचं साहित्य आणायला जिल्ह्याच्या गावी गेल्या होत्या. त्या रात्री घरी आल्यावर मॅडमनी त्यांना फोन केला. मॅडम म्हणाल्या, ""काय जळगावकरबाई, सुपरवायझर व्हायचं का?'' आता बिचाऱ्या बाई त्यावर काय बोलणार? ""हो, होते की!'' म्हणाल्या. आता त्यांना मुख्य शाळेत येऊन काम करावं लागणार... शिवणकामाचे वर्ग बहुधा रद्द!
Thursday, June 21, 2007
शाळा भरली...!!!
लेखक Dinesh ्वेळ 7:53 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment